काही महिन्यापूर्वी चुलीवर ठेवलेल्या गरम तव्यावर बसून आशीर्वाद देणारा एक बाबा व्हायरल झाला होता. त्या बाबाविरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अमरावतील जिल्ह्यातील गुरुदास बाबा यांच्यावर करण्यात आला आहे. तिवसा तालुक्यातील मार्डी येथे गुरुदास बाबा याचा आश्रम आहे.
आरोपीचे नाव गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर असे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच भोंदू बाबा फरार झाला आहे. तापलेल्या तव्यावर बसून चमत्कार केल्याचा दावा करताना गुरुदास बाबा प्रसिद्ध झाला होता.
येथील गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेला भोंदूबाबा सुनील जानराव कावलकर याचा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी आश्रम आहे. येथे अनेक भाविक आपल्या समस्या घेऊन येतात. जबलपूर येथील एक महिला आपल्या पतीचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी व कौटुंबिक कलहाला कंटाळून गुरुदासबाबाच्या आश्रमात आली होती.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती एका मैत्रिणीच्या मदतीने आश्रमात आली होती. या भोंदूबाबाने तिला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आल्यावर भेटायला बोलावले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला व तिला एकटीला बोलावून घेतले. त्यानंतर तिला त्याने सांगितले की, पाच सहा महिने आश्रमात रहावे लागेल व ती यासाठी तयार झाली.
दरम्यान भोंदूबाबाने तिला अंगारा खायला देऊन तिच्यावर तीन महिने अत्याचार केले. तसेच पती सुधारला नसल्यास मीच तुझ्याशी लग्न करण्यार असल्याचे आमिष दाखवले. पीडितेने आरोप केला कि, भोंदुबाबाच्या मोबाईलमध्ये तिचे अश्लील व्हिडिओ आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला बाबाने तिला नागपूरमध्ये सोडले. मे २०२३ ते २ जानेवारी २०२४ पर्यंत ती आश्रमात होती. मात्र तिच्या कुटूंबात काहीच चांगले न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिला कळले.
तिने बाबाला फोन केल्यानंतर भोंदूबाबाने तिलाच धमकावले. त्यानंतर पीडित महिलेने कुन्हा पोलिस स्टेशन गाठून भोंदू बाबाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरू पोलिसांनी सुनील जानराव कावलकर (वय ४७) याच्याविरुद्ध अत्याचार, धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केली आहे.