Amol Mitkari on Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवण येथील पुतळ्यावरून सत्ताधारी पक्षाचे व अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांची पुतळा तयार करणारे जयदीप आपटे यांच्या बाबत गंभीर विधान केले आहे.
'आपटे नावाच्या नवख्या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला. हा पुतळा राजकोट किल्यावर उभारला होता. या पुतळ्याच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ खोच दाखवण्यात आली असून या बाबत त्याने सनातन प्रभातला मुलाखत देत त्याचे कारण सांगितले होते. यावरून आपटे याचा काही छुपा अजेंडा होता का असा प्रश्न पडला आहे', असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.
मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा सोमवारी कोसळला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, “आपटेने पुतळ्यासंदर्भात सनातन प्रभातला मुलाखत दिली होती. यात त्याने म्हटले की, १६५९ नंतरचे छत्रपती शिवाजी महाराज रेखाटायचे होते. १६५९ मध्ये अफजलखानाबरोबर झालेल्या रणसंग्रामावेळी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता. महाराज अफजलखानासोबत लढण्यासाठी गेले असतांना खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला. यावेळी महाराजांना या झटापटीत छोटी इजा झाली होती. याचा उल्लेख देखील आहे. दरम्यान, अशा प्रकारचा पुतळा बनवून आपटे याला काय सांगायचं होतं? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची किती प्रतारणा करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. महाराजांबद्दलची मळमळ अजून का गेली नाही?” आपटे याला असा पुतळा तयार करून काही छुपा अजेंडा चालवायचा होता का असे देखील मिटकरी यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. कारण राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा असा केवळ एकमेव पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये घेण्यात आले. मात्र, यातून छुपा अजेंडा चालवण्याचं काम शिल्पकार आपटेने केल्याचा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपटेवर कारवाई करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. ऐवढचे नाही तर आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे.