who will be maharashtra cm : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा उलटला असला तरी नव्या मुख्यमंत्र्याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या महाराष्ट्राचे काळजीवाहू म्हणूंन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम पाहत आहेत. एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कशावरही नाराज नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, तो त्यांना मान्य असेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अजित पवार गुरुवारी दिल्लीला गेले आहेत. आज होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री व मंत्रीमंडळा बाबत निर्णय होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासन देत भाजप जो निर्णय घेईन त्याचे पालन केले जाईल, असे म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजप घेईल असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांच्या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भाजप लवकरच नवे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठीकीत संबंधित सर्व निर्णय घेतले जातील. नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया दिल्लीतच अंतिम केली जाणार आहे. भाजप नेतृत्वाच्या निर्णयाच्या बाजूने असून मुख्यमंत्र्यांच्या नावात अडथळे आणणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी दिली. नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म न मिळाल्याने नाराज असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. कुणीही रागावलेनसून आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने निराश आहात का, असे शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले, 'तसे काही नाही. भाजपने माझ्या कार्यकाळाला पाठिंबा दिला होता, हे लक्षात ठेवावे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीने विधानसभेच्या २८८ जागांपैकी २३० जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने १३२ जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी केली असून शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागा मिळाल्या, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला २० जागा मिळाल्या.