Ajit Pawar : ‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजित पवारांची अमित शहांवर स्तुतिसुमने
Ajit Pawar on Amit shah : केंद्रीय गृहमंत्री आज पिंपरी-चिंचवड येथील सहकार परिषदेसाठी आले असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहा यांचे तोंडभरून कौतुक केले.
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुण्यात असून त्यांच्या हस्ते केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक केले. “सहकार हे एकमेव क्षेत्र प्रत्येक गावात आणि खेड्यातील प्रत्येक घरात पोहचले आहे,” असे पवार म्हणाले.
ट्रेंडिंग न्यूज
अजित पवार म्हणाले, “अमित शाह हे मूळचे गुजरात येथील आहे. मात्र, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावाई आहेत असे म्हणताच उपस्थितांमद्धे हशा पिकला. पवार म्हणाले, प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे.
“पवार म्हणाले, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला सहकाराने मजबूत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांनी या मंत्रालयाचे नेतृत्व सांभाळलं आहे. सहकारातून समृद्धी अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्यानुसार अमित शाह हे सहकार मंत्रालयाद्वारे काम करत आहे, असे देखील पवार म्हणाले.