आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याच्या वादानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्ले आढळली आहेत. त्यानंतर प्रसाद स्वच्छ ठिकाणी ठेवले जात नाहीत आणि तो अशुद्ध आहे, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना वाटप करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या लाडूच्या पाकिटात उंदराची पिल्ली आढळल्याचा आरोप एका व्हिडिओच्या आधारे लावले जात आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रसादाच्या पाकिटांमध्ये उंदीर दिसत आहेत. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी हे मानण्यास नकार दिला आहे की, हे फुटेज मंदिरातील आतील आहे. त्यांनी असेही सांगितले की, व्हायरल फोटो व व्हिडिओ फुटेजची तपासणी केली जाईल.
या मंदिरात दररोज सुमारे ५० हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी ५० ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापूर्वी अन्न व औषध विभागाचे अधिकारी नियमितपणे या लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची तपासणी करून ते सर्टिफाइड करतात.
प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार हे लाडू सात ते आठ दिवस साठवून ठेवता येतात, ते खराब होत नाहीत, मात्र लाडूंमध्ये उंदीर असल्याचे फुटेज समोर आल्यानंतर मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छतेबाबत आणि शुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तिरुपती मंदिराच्या लाडूंमधील जनावरांच्या चरबीच्या मुद्द्यावरून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादासाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने मंदिराला तूप पुरवठा करणाऱ्या चार कंपन्यांच्या उत्पादनांचे नमुने मागवून त्यांची तपासणी केली होती. यातील एका कंपनीचे उत्पादन नमुने मानकांशी सुसंगत नसल्याचे आढळून आले.