रणवीर अलाहाबादीच्या अश्लिल कमेंटवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' चांगलाच अडचणीत आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ''इंडियाज गॉट लॅटेंट'' या मालिकेचे निर्माते समय रैना आणि इतर अनेकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासून सहाव्या भागापर्यंतचे सर्व होस्ट आणि गेस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने ''इंडियाज गॉट लॅटेंट' या युट्युब शोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून ते एपिसोड ६ पर्यंत यात सहभागी असलेल्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल.
या वादग्रस्त शोच्या आतापर्यंतच्या कंटेंटचा आढावा घेतल्यानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय न्यायिक संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सुरू असून संबंधितांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलने दिली आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधितांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
एक दिवसाआधी आसाम पोलिसांनी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने ३१ वर्षीय रणवीर अलाहाबादिया सोबतच ''इंडियाज गॉट लॅटेंट' च्या पहिल्या ते सहा एपिसोडपर्यंत संबंधित सर्व लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलाहाबादी व्यतिरिक्त आशिष चंचलनी, जसप्रीत सिंह, अपूर्व मखीजा आणि समय रैना अशी आरोपींची नावे आहेत.
'इंडियाज गॉट लॅटेंट'या शोच्या एका एपिसोडमध्ये इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. या व्हिडीओमध्ये रणवीरने आई-वडील आणि मुलाच्या नात्यावर अश्लिल कमेंट केली होती. या वक्तव्यानंतर शो आणि त्यातील स्पर्धकांवर जोरदार टीका करण्यात आली. सोशल मीडियावर यावरून टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या मालिकेचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवण्याची मागणी केली आहे. हा कंटेंट यूट्यूबवरून हटवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ही क्लिप हटवण्यात आली होती. या वादानंतर रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडियावर एक माफीचा व्हिडिओ जारी केला आहे.
संबंधित बातम्या