कौटुंबिक वादातून पतीने रागाच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. ही खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये घडला होता. आरोपी पती पत्नीच्या हत्या करून वाराणशीला पळून गेला होता. घटनेच्या ८ दिवसांत पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला वाराणशीतून अटक केली आहे. मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने पत्नीशी वाद झाला, त्यातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत ही घटना घडली. विकी लोंढे असे आरोपीचे नाव असून मृत पत्नीचे नाव रूपाली लोंढे असे आहे. हे दाम्पत्य आपल्या एक वर्षाच्या मुलीसह येथे वास्तव्याला होते. रूपालीला मुलीचा सांभाळ नीट करता येत नसल्याने विकीचे तिच्यासोबत नेहमी वाद होत होता.
या कारणावरूनच ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात विकीने रूपालीचा पट्ट्याने गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरला. या हल्ल्यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या करून विकी हा उत्तर प्रदेशात पळून गेला. पोलिसांनी त्याचा माग काढत हत्येच्या ८ दिवसानंतर त्याच्या वाराणशीतून मुसक्या आवळल्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून त्याला पकडले.
त्याला आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.