पंतप्रधान मोदींनी उशिरा माफी मागितली; शिवशाहीत चुकीला माफी नसतेः शिवसेना-ambadas danve says pm modi apologize veryb late to shivaji maharaj followers ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंतप्रधान मोदींनी उशिरा माफी मागितली; शिवशाहीत चुकीला माफी नसतेः शिवसेना

पंतप्रधान मोदींनी उशिरा माफी मागितली; शिवशाहीत चुकीला माफी नसतेः शिवसेना

Aug 30, 2024 05:22 PM IST

pm modi apology : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची फार उशिरा माफी मागितली असून आता माफीने काही होणार नाही असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी उशिरा माफी मागितलीः अंबादास दानवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी उशिरा माफी मागितलीः अंबादास दानवे

'मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची फार उशिरा माफी मागितली आहे. मात्र आता माफीने काहीही साध्य होणार नाही. आणि शिवरायांच्या दरबारात माफी नसायची. थेट ‘कलम’ केलं जायचं. मोदी यांनी कितीही माफी मागितली तरी आता जनता राज्यातलं भ्रष्टाचारी सरकार थेट कलमच करणार आहे' अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. पालघर येथे वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात बोलताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी शिवाजी महाराज आणि शिवभक्तांची नतमस्तक होऊन माफी मागत असल्याचे म्हणाले होते. यावर शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते, राज्याच्या विधानपरिषदेतील अंबादास दानवे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, ‘वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदीजी महाराष्ट्रात आले. ते पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचंच काम करत आहेत. स्थानिक मच्छिमार कोळी बांधवांनी वाढवण बंदराला विरोध केला आहे. एवढा विरोध असूनही वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी आले. स्थानिक कोळी बांधवांच्या हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर निघाली नंतर टेंडर काढण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामावर एकूण २ कोटी ४० लाख रुपये खर्च झाला होता. आणि पुतळ्याच्या उदघाटनासाठी आलेल्या पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जवळच उभारण्यात आलेल्या हेलिपॅडला सव्वा दोन कोटी रुपये खर्च आला. असा भ्रष्टाचाराचा विळखा घातलेला होता’, असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले. 

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला माफी नाही

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी दिली आहे. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी X वर दिली आहे.