
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : छत्रपती संभाजी नगर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून दोघांच्या वादाला पूर्ण विराम दिला आहे. खैरे यांना दानवे यांनी निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दानवे विरुद्ध खैरे वादामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली होती. दोघेही लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान, पक्षाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याने दानवे हे नाराज होते. दरम्यान, त्यांनी खैरे यांचा प्रचार न करता केवळ पक्षाचे काम करू अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांचा वाद हा चव्हाट्यावर आला होता. दरम्यान, अंबादास दानवे यांनी माघार घेत आज खैरेंची यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत पेढा भरवला. तसेच खैरे यांना शाल आणि बुके देखील भेट देत दोघांमधील वाद संपवला.
छत्रपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे हे गेल्या काही वर्षांपासून इच्छुक आहेत. मात्र, त्यांना ही संधी अद्याप मिळालेली नाही. चंद्रकांत खैरे हे संधी देत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यामुळे चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा वाद उफाळून आला होता. या वादामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र, दानवे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत ही शक्यता फेटाळून लावली.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याची भावना चंद्रकांत खैरेंची आहे. तशी ती त्यांनी जाहीर बोलून देखील दाखवली आहे. चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गेल्या आठवड्यात केले, मात्र यावेळी दानवे यांना बोलावले नसल्याने हा वाद वाढला होता. यमुळे थेट उद्धव ठाकरें यांनी मध्यस्थी केली होती. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अंबादास दानवेंनी व्हाट्सअप स्टेटस ठेवत पुन्हा नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा वाद त्यांनी आता संपवला आहे.
या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले, आमच्यात वैचारिक वाद होते. मात्र, हे वाद दूर झाले असून आम्ही एकत्र काम करू आणि जिंकू देखील. आम्ही दोघेही मित्रच आहोत. मात्र, आमच्या अपेक्षा होत्या, असे देखील ते म्हणाले.
संबंधित बातम्या
