मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohsin Shaikh: सर्वच आरोपी निर्दोष मग मोहसीनची हत्या कुणी केली?, कोर्टाच्या निकालानंतर मौलवींचा सवाल

Mohsin Shaikh: सर्वच आरोपी निर्दोष मग मोहसीनची हत्या कुणी केली?, कोर्टाच्या निकालानंतर मौलवींचा सवाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 11:31 PM IST

Mohsin Shaikh Murder Case : पुण्यातील आयटी इंजिनियर मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाईसह सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

Mohsin Shaikh Murder Case
Mohsin Shaikh Murder Case (HT)

Mohsin Shaikh Murder Case : छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात उसळलेल्या दंगलीत हडपसरमध्ये आयटी इंजिनियर मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह तब्बल २० जणांवर मोहसीन शेखच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु आता पुणे सत्र न्यायालयानं मोहसीन शेख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाईसह अन्य २० आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता जर सर्व आरोपी निर्दोष आहे तर मोहसीनची हत्या कुणी केली?, असा प्रश्न जमियतचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम जाहुरकर यांनी उपस्थित केला आहे.

मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर जमियतचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम जाहुरकर यांनी पुणे सत्र न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय पुणे सत्र कोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचंही मौलाना इब्राहिम यांनी म्हटलं आहे. मोहसीन शेखची हत्या झाल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना पुणे सत्र न्यायालयाकडून शिक्षा होईल, असं वाटत होतं. परंतु त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यामुळं निराश झालो असून आता मोहसीनची हत्या कुणी केली?, असा सवाल आम्हाला पडल्याचंही मौलाना इब्राहिम यांनी म्हटलं आहे.

जून २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचार झाला होता. पिंपरी चिंचवडमध्ये संतप्त जमावानं पीएमपीएलच्या बसेस जाळल्या होत्या. तर हडपसरमध्ये जमावाकडून आयटी इंजिनियर असलेल्या मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह २० जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु आता पुणे सत्र न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यामुळं जमियत संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.

WhatsApp channel