Alibag Shocking: रायगडच्या खालापूर येथील धरणांत ४ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातील मुनवली येथील तलावात पोहायला गेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही पाण्यात बुडाली अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हाके आणि शुभम बाला अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोन्ही मुले पोहायला गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. या घटनेनंतर जिल्ह्यातून विविध बचाव बथकांचे पाचारण करण्यात आले. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले. तर, शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दोन दिवसाआधी रायगडच्या खालापूर येथे अशीच एक घटना घडली. मुंबईतील रिझवी महाविद्यालयातील वर्षासहलीसाठी आलेल्या ४ विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे असलेल्या छोट्या धरणात ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी स्थानिक बचाव पथकांने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. एकलव्य सिंह, ईशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवी महाविद्यालयातील ३७ विद्यार्थी सहलीला गेले होते. या विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सोंडाई किल्ल्यावर ट्रेक केला. त्यानंतर ते जवळच्या धरणात पोहायला गेले. त्यावेळी पाण्यात बुडत असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला.