Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!-akshay shinde funeral is not held protest banners are also in the hindu graveyard of ambernath ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!

Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!

Sep 29, 2024 10:57 AM IST

Akshay Shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर होऊन पाच दिवस उलटून देखील अद्याप त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाही. बदलापूर, ठाणे व कळवानंतर आता अंबरनाथमधील हिंदूस्मशानभूमीत देखील त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारा विरोधाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!

Akshay Shinde news : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करून पाच दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. बदलापूर, ठाणे व कळवानंतर आता अंबरनाथमधील हिंदूस्मशानभूमीत देखील त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून निषेधाचे बॅनर स्मशानभूमीत लावले आहेत. शिवसेनेतर्फे हे विरोधाचे बॅनर लावण्यात आले असून अक्षयच्या दफनविधीस विरोध करण्यात आला आहे.

अंबरनाथ नगरपरिषद आपल्या मुलाच्या अंत्यसंस्काराला परवानगी देत नसल्याचा आरोप करत अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, या वर कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्यात येईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शिंदे यांच्या वकिलांनीही कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा शिंदेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं असून त्यांना योग्य पोलिस संरक्षण देण्याची मागणी वकिलाने प्रशासनाकडे केली.

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, अक्षय शिंदेचे कुटुंब त्याच्या दफनभूमीच्या शोधात आहेत. त्यांच्या समाजात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे, असा पोलिसांचा समज आहे. मात्र, समाजातील ज्येष्ठांकडे चौकशी केल्यानंतर अशी कोणतीही प्रथा नसल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे अक्षयच्या मृतदेहांचे लवकरात लवकर अंत्यसंस्कार करायला हवे.

अक्षय शिंदेचा अंत्यविधी होत नसल्याने त्याच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली होती. अंत्यविधीला अनेक शहरांमधून विरोध होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याचा अंत्यविधी होऊ शकत नाही, असं देखील कोर्टात सांगण्यात आलं होतं. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी राज्य सरकारने घेतल होती. शिवाय, शिंदेचा अंत्यविधी शांततेत होईल याची पोलीस खबरदारी घेतील अशी हमीही सरकारने दिली असतांना अजूनही हा अंत्यविधी झालेला नाही, असे अक्षयच्या वकिलांनी म्हटलं आहे.

अक्षय शिंदेचे वकिल अमित कटारनवरे म्हणाले, अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी सरकार जागा देत नाही. मला याचं वाईट वाटतं. आपल्या देशात सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली तर याकूब मेमन सारख्या व्यक्तीला देखील देशात जागा मिळते. मात्र अक्षयला कुठल्याही न्यायालयाने दोषी ठरवले नसतांना त्याला मारण्यात आलं. तसेच त्याच्या मृतदेहांचा दफनभूमीसाठी जागा मिळत नाही हे योग्य आहे का?

शवविच्छेदन आणि इतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना त्याच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली. अक्षय बदलापूरचा रहिवासी असल्याने सुरुवातीला तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, ही बातमी स्थानिकांना समजताच बदलापूरच्या अनेक रहिवाशांनी त्याला विरोध केला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी कारवाई थांबवली. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या अंबरनाथ आणि कल्याणमध्ये दफनभूमीचा शोध घेतला, मात्र त्या भागातील रहिवाशांनीही अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध केला.

बाहेरच्या व्यक्तिंना दफनविधीसाठी परवानगी नाही : अंबरनाथ नगर परिषद 

अंबरनाथ नगरपरिषदेने आपल्या मुलाच्या दफनविधीसाठी जागा देण्यास नकार दिल्याच्या अण्णा शिंदे यांच्या तक्रारीबाबत पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ म्हणाले की, दफनभूमी देण्याबाबत अद्याप कोणत्याही प्राधिकरणाकडून आदेश मिळालेले नाहीत. शहराबाहेरील व्यक्तीच्या दफनविधीसाठी पालिका परवानगी देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. काही राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेऊन पालिकेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी नाकारली आहे, अशी माहिती डॉ. रसाळ यांनी दिली.

Whats_app_banner