who is encounter specialist sanjay shinde: राज्यसह देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये सोमवारी मारला गेला. या घटनेमुळे आता पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी पोलिसांच्या व सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत हा एन्काऊंटर जाणून बुजून खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. संजय शिंदे या पूर्वीही अनेक वादात अडकले आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
बदलापूर येथे एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने हा अत्याचार केल्याच पुढं आलं. पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या साठी बदलापूर येथे मोठे आंदोलन झाले होते. यानंतर या प्रकरणी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. अक्षय शिंदेला सोमवारी संध्याकाळी सायंकाळी ६ च्या सुमर्स तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्यात नेत होते. यावेळी गाडीत अक्षय शिंदे याने शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. अक्षयने सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कंबरेवरून बंदूक काढून नीलेश मोरे यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळ्या इतरत्र गेल्या. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर देत व स्वसंरक्षणार्थ त्यांच्या बंदुकीतून अक्षय शिंदेवर काही गोळ्या झाडल्या. यात अक्षय शिंदेला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. दवाखानेत नेल्यावर त्याला डॉक्टरांनी देखील मृत घोषित केले.
पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाठ कार्यरत होते. बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. संशय शिंदे यांनी या पूर्वी माजी पोलिस अधिकारी व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात संजय शिंदे यांनी काम केले आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी ३०० पेक्षा अधिक गुन्हेगारांचा सामना केला आहे. तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत १०० हून अधिक गुन्हेगारांचा खात्मा देखील त्यांनी केला आहे. १९८३ मध्ये पोलिस दलात सामील झाल्यावर, १९९० च्या दशकात मुंबईला अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांनी विळखा घातला होता. विशेषतः दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनशी संबंधित गुंडांनी उच्छाद मांडला होता. या दोन्ही टोळ्यातील अनेक गुंडांना त्यांनी ठार मारलं. गुंडांशी झालेल्या अनेक हाय-प्रोफाइल चकमकींमध्ये भाग घेतल्याबद्दल प्रदीप शर्मा यांना प्रसिद्धी मिळाली तसेच त्यांच्या पथकात असलेले संजय शिंदे हे देखील प्रकाश झोतात आले होते.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्यात शिंदेची मोठी भूमिका होती. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या पथकाचे संजय शिंदे हे सदस्य होते. त्यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांमध्ये काम केले आहे आणि सध्या बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.
संजय शिंदे या पूर्वी देखील काही कारणामुळे वादात सापडले आहेत. खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. पालांडेला पळून जाण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर होता. कारण पालांडे ज्या गाडीतून पळून गेला त्या गाडीत शिंदे यांचा गणवेश सापडला होता. दरम्यान, यानंतर २०१४ मध्ये ते पुन्हा कामावर परतले.