बदलापूरमधील एका नामांकित शाळेत घडलेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणावरून संपूर्ण राज्य तसेच देशभरातील लोकांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर असून हा फेक एन्काऊंटर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे.
न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज (सोमवार) मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. या अहवालामध्ये पोलिसांकडून अक्षयचा फेक एन्काऊंटर केला केल्याचं नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. अक्षयने पोलीस व्हॅनमध्येच पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची माहिती देण्यात आली होती. आरोपीने केलेल्या गोळीबारात एक पोलिस अधिकारीही जखमी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या, हा पोलिसांचा दावा संशयास्पद असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत ५ पोलिसांनी केलेला बळाचा वापर अनावश्यक व अनुचित होता. त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी म्हटले की, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र मृताच्या बोटांचे ठसे बंदुकीवर नाहीत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे. त्यामुळे या पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल वाचून दाखवला. गोळा केलेल्या साहित्यानुसार आणि एफएसएल अहवालानुसार, मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे म्हटले जाते.
अक्षय शिंदे हा बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी होता. याप्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्यात आणले जात असताना मुंब्रा बायपासजवळ त्याचा एन्काऊंटर केला होता.
संबंधित बातम्या