बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसानी मुंब्रा बायपास रोडवर एन्काउंटर करून ठार केले. आता अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांनी विरोध केला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मांजर्ली येथील सार्वजनिक स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरमध्ये राहत असल्याने त्याच्यावर नगरपालिकेच्या स्मशानभमीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मात्र याला नागरिकांकडून कडाडून विरोध केला जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदे याचे मांजर्ली स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. मात्र अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करु शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अक्षय शिंदे याचे नाव समोर आल्यानंतर नागरिकांनी त्याच्या कुटुंबाला हाकलून लावले होते. गेल्या महिनाभरापासून शिंदे याचे घर बंद आहे. त्याचे कुटुंबीय बदलापूर बाहेर राहत आहेत. त्यामुळे बदलापूर शहराचे नाव बदनाम करून अत्याचार करणाऱ्या नराधमावर बदलापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले जाणार नाहीत,असा आक्रमक पवित्रा बदलापुरातील नागरिकांनी केला आहे.
एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या अक्षय शिंदे याच्यावर जेज रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला आहे. आज त्याच्या मृतदेह त्याच्या बदलापूर येथील राहत्या घरी नेण्यात येण्याची शक्यता आहे. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई परिसरात राहात होता. तेथे त्याचे छोटे घर आहे. बदलापूर प्रकरणानंतर जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली होती. तेव्हा पासून त्याचे घर हे बंद होते. अक्षयचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. त्याच्यावर बदलापूर इथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. अक्षयचे नातेवाईक बदलापूर येथील त्याच्या घरी दाखल झाले आहेत.एका महिन्यानंतर त्याचे बदलापूर येथील घरही उघडण्यात आले आहे. परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन न करता त्याचा मृतदेह पुरण्यात येणार आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकिल अॅड. अमित कटारनवरे म्हणाले, पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेह दहन न करता पुरला जाणार आहे. ज्यामुळे भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय मिळवून द्यायचा आहे, असे अक्षय शिंदे याच्या वडिलांनी सांगितले.