Car Hits Bike In Akola: अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ भरधाव कारने दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत एक महिला आणि तिच्या ९ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. तर, पती आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर जवळच्या रग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कशफ खान (वय,२८) आणि अनाया फातेमा (वय, ९ महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर, कशफ यांचा पती उस्मान खान रहमान खान आणि मुलगा सदम खान (वय, ५) गंभीर जखमी झाला आहे. उस्मान हा त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसह दुचाकीने अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. परंतु, व्याळाजवळ आले असता एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कशफ यांचा जागीच मृत्यू झाला आणि उस्मान आणि त्यांचे दोन्ही मुले गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अनाया फातेमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली असून पुढील तपासाला सुरूवात केली. आरोपी कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लवकरच आरोपी अटक करण्यात येईल, असे अश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. दरम्यान, अकोल्यातील ही घटना अत्यंत धक्कादायक असून या अपघातात माय- लेकीला आपला जीव गमावावा लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटल परिसरात आज पहाटे विचित्र अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका मागून एक गाड्याने धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटेची वेळ असल्याने टेम्पो चालकाला अंदाज न आल्याने टेम्पोने डंपरला धडक दिली आणि यानंतर पाठीमागून येणारी दुचाकी टेम्पोला धडकली. या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. वैभव डावखर (वय, २७) असे दुचाकीस्वारचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई नाशिक हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू झाली.
संबंधित बातम्या