Akola Balapur crime : राज्यात बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मंगळवारी मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत तोडफोड केली. ही घटना ताजी असतांना अकोल्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने ६ मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्या छळ केल्याचे उघड झाले असून मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सरदार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याच्यावर मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा शिक्षक ८ वीच्या मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांचा छळ करत होत. ऐवढेच नाही तर त्यांना व्हिडिओ दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता तर त्यांच्या सोबत अश्लिल बोलतही होता. ही बाब पीडित मुलीनी घर सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे पालखी हदारले. त्यांनी थेट उरळ पोलिस ठाण्यात जात नराधम शिक्षका विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन ६ मुलींचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा मंगळवारी उद्रेक झाला होता. काल सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर आणि बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करत तूफान दगडफेक केली. रात्री पर्यंत ही आंदोलन सुरू होते. अखेर पोलिसांनी जमावर लाठीचार्ज करत पांगवले. या आंदोलनामुळे दिवसभर रेल्वे सेवा ठप्प झाली होती. या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी शाळेची आणि या घटणेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.