Akola News : अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात दूषित पाणी प्यायलयाने सेंटरमधील तब्बल ७० मुलींना उलट्या, जुलाब आणि कॉलरा, कावीळ सारखे आजार झाल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आला असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले आहेत.
अकोला येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रातील असणाऱ्या ७० प्रशिक्षणार्थी मुलींनी शुक्रवारी दुषित पाणी प्यायल्यामुळे विषबाधा झाली. एवढेच नाही तर काही मुलींना, कॉलरा आणि कावीळ देखील झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर राज्याचे पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी अकोल्यातिल या सेंटरला भेट दिली असून त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी प्रशिक्षणार्थी मुलींची प्रकृती दूषित पाण्यामुळे खराब झाली असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाची चौकशी 'एसआयटी' मार्फत करण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल ७० पेक्षा जास्त महिला पोलिसांना दूषित पाणी प्यायल्याने त्रास झाला आहे. त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यात अकोला राज्यात सर्वाधित उष्ण होते. येथील पारा ४२ डिग्री सेल्सिअसच्या घरात गेलेला आहे. त्यात दूषित पाणी प्यायल्याने मुलींच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांना मळमळ, उलट्या सुरू होत्या. यामुळे सर्व महिला पोलिसांची अकोल्यात एका रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, या गंभीर घटनेबाबत पोलीस प्रशिक्षण केंद्राने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, एका वृत्त वाहिनीने या संदर्भात वृत्त दिल्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानुसार अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी स्वत: या केंद्रात येऊन पाहणी केली.
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या केंद्रात सध्या पोलिस भरती झालेल्या ७४१ मुली प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांनी दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. या खाजगी रुग्णालयात आमदार अमोल मिटकरी, भाजप आमदार रणधीर सावरकर तसेच वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी भेट देत मुलींची विचारपूस केली आहे. तसेच या बाबत 'एसआयटी' चौकशीची मागणी करण्यात आली आहे.