भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वंचितचे ४० ते ५० कार्यकर्ते स्टेजवर चढले व त्यांनी योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडलं. योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांच भाषण सुरू असताना त्यांच भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. खुर्च्यांची तोडफोड झाली. दरम्यान यावर योगेंद्र यादव याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
लोकशाहीचे रक्षण करण्याच्या चर्चेमध्ये सुद्धा लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही, ही सध्याची स्थिती आहे. हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी ॲड.प्रकाश आंबेडकरांची मान खाली घातली आहे, असे यादव म्हणाले. महाराष्ट्रात १०० च्यावर व्याख्यान दिले आहेत. मात्र, आजपर्यंत अशी घटना कधीही घडली नव्हती. ते कोण आहेत, ज्यांना माझ्या बोलण्याची भीती होती. निर्भयता आमचा संकल्प आहे. अकोल्यात पुन्हा भाषण देण्यासाठी निश्चित येईल.
या कार्यक्रमात संतप्त जमावाने योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. भाषणाच्या वेळी ४० ते ५० संतप्त लोकांनी स्टेजवर चढून त्यांना बोलण्यापासून रोखले. यावेळी त्याच्यासोबत धक्काबुक्कीही झाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात योगेंद्र यादव संतप्त जमावाशी संवाद साधताना दिसत आहेत. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला.
सोमवारी अकोला येथे 'लोकशाही सुरक्षा आणि आपले मत' या विषयावर बैठक झाली. स्वराज पक्षाचे नेते योगेंद्र यादव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. येथे त्यांच्या भाषणामुळे संतप्त जमावाने त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी ४० ते ५० जणांचा जमाव स्टेजवर घुसला, असा दावा त्यांनी केला. काही वेळातच पोलिस तेथे पोहोचले असले तरी कार्यक्रम मध्येच थांबविण्यात आला.
एक्स वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये यादव यांनी भारत जोडो अभियानातील आपल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेला हल्ला लोकशाहीप्रेमींसाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा जमाव मंचावर चढला, त्यावेळी आम्ही "संविधान आणि आमचे मत रक्षण" यावर चर्चा करत होतो. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही हल्लेखोरांनी तोडफोड सुरूच ठेवली आणि कार्यक्रम रद्द करावा लागला.