Akola News : पतीच्या सुख-दु:खात साथ देणारी पत्नी त्याच्या खांद्याला खांदा लावून संसार करत असते. सोबत जगण्या मरण्याची भाषा प्रेमी युगुल तर लग्नाआधी व काही जण लग्नानंतर करत असतात. मात्र याची प्रचिती अकोला शहरात आली आहे. शहरातील एका वयस्कर दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. ६० वर्ष वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत केल्यानंतर या जोडप्याने जगाचा निरोप घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील गुजराती पूरा भागात ही घटना घडली. पतीच्या मृत्यूनंतर निधनानंतर अवघ्या ८ तासातच पत्नीने जग सोडले. लग्नानंतर ६० वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतराने अनंताचा प्रवास सुरू केला.
८२ वर्षीय रमेशसिंग आणि ७६ वर्षांच्या पदमाबाई या वयस्कर दाम्पत्यानं एकाच दिवशी जग सोडले. या दोघांच्या मृत्यूमध्ये ८ तासांचा फरक आहे. एकाच वेळी दोघांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले. साधारणत: ६० वर्षांपूर्वी रमेशसिंग व पदमाबाई यांचा विवाह झाला होता. त्यावेळी रमेशसिंह यांचे वय २२ वर्षे तर पदमाबाई यांचे वय अंदाजे १६ वर्षे होते.
लग्नानंतर पद्माबाईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य घालवलं. दोघेजन ६० वर्षापेक्षा अधिक काळ एकमेकांच्या सहवासात राहिले. त्यानंतर रविवारी मध्यरात्री दोघांचे निधन झाले. सोमवारी दुपारी बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय भावनिक आणि अतूट प्रेमाचे उदाहरण सादर करणाऱ्या या प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले.
रमेशसिंग गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचे रविवारी (२६ मे) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पतीच्या निधनाने पद्माबाई यांना मोठा धक्का बसला व सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांही देह सोडला. सकाळच्या सुमारास पती-पत्नीच्या निधनाची बातमी परिसरात पसरली व सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. दोघांच्या पार्थिवावर आज दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत गावकरी व नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या