Jai malokar death case : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात आंदोलन करताना अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार याचा मृत्यू झाला होता. दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
जय मालोकारचा (jai malokar) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर बेदम मारहाणीत झाल्याचं पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. मालोकारच्या अनेक अवयवांना गंभीर दुखापती होत्या. या जखमांमुळेच मालोकार याचा मृत्यू झाल्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्ते आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात आंदोलन करत होते. ३० जुलै २०२४ रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला करत काचा फोडल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादी व मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी मनसेच्या २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये जय मालोकार यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र त्याच दिवशी मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा दावा केला होता. जर मनसेच्या विद्यार्थी सेनेचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच तो परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यानंतर काही तासातच जयसोबत नेमकं काय झालं होतं?, याची चौकशी करण्याची जयच्या कुटूंबीयांनी मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून जयच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांच्याकडून आमच्या जीवितीला धोका असल्याचा आरोप मालोकार कुटुंबीयांनी केली होती. त्यातच आता वैद्यकीय अहवाल समोर आला असून जयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून मारहाणीत झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.तसेच हे प्रकरण सीबीआयला सोपवावे, अशी मागणी जय मालोकारचा मोठा भाऊ विजय मालोकार यांनी केली आहे.
३० जुलै २०२४ रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहासमोर जोरदार राजा केला होता. यानंतर जय मालोकार याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार याच्या छातीत दुखत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र वैद्यकीय अहवालात जयच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापतींमूळ मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.