अकोला शहरातील हरिपेठ भागात दोन गटात तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन गटात झालेल्या दगडफेकीने रस्त्यावर दगडांचा खच पडल्याचे दिसून येत होते. जमावाने अनेक वाहनांनाही आगी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
एका रिक्षाला धक्का लागल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला. हरीपेठ भागात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. ज्याचे पर्यावसान दगडफेक आणि जाळपोळीत झाले. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या भागात मे २०२३ मध्येही दंगल झाली होती. हरिहरपेठ भागातील गाडगे महाराजांचा पुतळा परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ झाली. पोलीस व दंगल विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे. या राड्यानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक रिक्षाची एका बाईक चालकाला धडक लागली. यानंतर रिक्षा चालक व मोटारसायकलस्वार तरुणामध्ये झालेल्या वादातून रिक्षा जाळण्यात आली. त्यानंतर वाद वाढत गेला व जमावाने दोन बाईकही पेटवल्या. राडा झाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी दिली आहे. लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या