मुलानं अनुसूचित जातीतील मुलीवर प्रेम केल्याच्या रागातून वडिलांनी व भावाने मिळून २६ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिटवा गावात ही घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय २६) असं मृत तरुणाचं नाव असून नागोराव कर्णाजी गावंडे असं आरोपी वडिलांचं नाव आहे.
विशेष म्हणजे मुलाची हत्या करून मारेकरी वडील आणि भाऊ सर्व बाहेरगावी निघून गेले होते. संदीपचा मृतदेह राहत्या घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. तर घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याचे समजले. ते सर्व लोक आज दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आला. याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गावातील नागोराव गावंडे यांना दोन मुले होते. एकाचं नाव संदीप आहे. तो पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान, संदीपचं गावातील एका अनुसूचित जातीतील मुलीशी प्रेमसंबंध होतं. ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. याची माहिती मिळताच वडिलांनी त्याची हत्या केली.
खालच्या जातीतील मुलीवर प्रेम का केलं याचा जाब विचारत वडील व भावाने मिळून संदीपची गळी आवळून हत्या केली. त्यानंतर ते संदीपचे हात पाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरात येऊन कोणीतरी संदीपला मारल्याचा बनाव रचला मात्र त्यांचे बिंग फुटले.