एका २१ वर्षीय तरुणीवर दोन नराधमाने ३ महिने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे. आरोपींनी तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तिला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तिच्यावर अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील एका खोलीत बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर हा प्रकाराला वाचा फुटली. या घटनेने घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान पीडितेने तक्रार दाखल करून तसेच गुन्हा दाखल करून १३ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मुकाट आहेत. यामुळे आता पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अत्याचार करणाऱ्या आरोपींवर ३६३, ३७६, (२)(N), ३७७, ३२३, ५०६ आणि ३४ नूसार गुन्हे दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी ५ डिसेंबर २०२३ रोजी शौचालयाला जात असताना दोन तरुणांनी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला आपल्यासोबत घेऊन गेले. नराधमांनी अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील खोलीत नेऊन चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी तिचे फोटो काढत तिला ब्लॅकमेल करत तसेच कुटुंबासह तिला जीवे मारण्याची धमकी देत दोघांकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. २६ मार्च २०२४ पर्यत हा सर्व प्रकार सुरूच होता.
२७ मार्च रोजी पीडितेने त्यांच्या तावडीतून सुटका करत घर गाठलं व सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पीडितेने कुटुंबासह बार्शी टाकळी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र त्यानंतरही पोलिसांनी काही कारवाई न केल्याने दोघे पीडितेच्या घरासमोर यायचे आणि जिवे मारण्याची धमकी द्यायचे. या त्रासाला कंटाळून पीडितेने पुन्हा ११ मे रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अत्याचार करणाऱ्या तरुणांपैकी एकाची तिच्याशी ओळख होती. या प्रकरणात चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून यात एका महिलेचाही समावेश आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.