Sharad Pawar : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा कोणाला? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका-akhil bharatiya marathi natya parishad election ncp chief sharad pawar clear his stand ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा कोणाला? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा कोणाला? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Mar 28, 2023 03:50 PM IST

Sharad Pawar on Marathi Natya Parishad Election : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या १६ एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यातील सध्याच्या कुरघोडीच्या राजकीय वातावरणामुळं या निवडणुकीला राजकीय रंग येण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्यानं निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे, असं शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नाट्य परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत अभिनेते प्रशांत दामले आणि नाट्य निर्माते प्रसाद कांबळी यांचे गट आमनेसामने आहेत. प्रशांत दामले हे ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि प्रसाद कांबळी हे ‘आपलं पॅनेल’चं प्रतिनिधित्व करत आहेत.

दोन्ही पॅनलनं आपापल्या उद्दिष्ट्ये सर्वांसमोर ठेवली आहेत. नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं काही जण बोलत होते. त्यासाठी आमच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची गळ घालण्यात आली होती. हे सगळं लोकशाहीला मारक असल्याचं प्रसाद कांबळी म्हणाले. बाहेरच्या अदृश्य शक्तींना विरोध करण्यासाठी जागरूक रंगकर्मी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत, असं ते म्हणाले. 

हौशी, प्रायोगिक, बालरंगभूमी अशा सर्व प्रकारच्या नाटकांसाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच त्यांना अधिकाधिक सवलती मिळवून देण्याचं उद्दिष्ट ‘आपलं पॅनल’नं जाहीर केलं आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सहभागी संस्थांचं अनुदान ६ हजारांवरून १५ हजार करण्यासाठी प्रयत्न  करतानाच व्यावसायिक नाट्य संस्थांसाठी प्रत्येकी ५ लाख आणि हौशी नाट्य संस्थांसाठी प्रत्येकी २ लाखांचं अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या पॅनलनं म्हटलं आहे.