Economist Ajit Ranade : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची शनिवारी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संस्थेच्या म्हणण्यानुसार रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांचे उल्लंघन करून झाली. रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. संस्थेने रानडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की समितीचे मत आहे की त्यांची निवड ही यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित निकषांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना कुलगुरू या पदावरून हटवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रानडे यांनी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
प्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाच्या नियुक्तीतील गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांची कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या बाबत जीआयपीईचे कुलपती विवेक देबरॉय यांनी दोन पानांचे पत्र जारी करून रानडे यांना कुलगुरू पदावरून दूर केले आहे.
या पत्रात रानडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एफएफसीच्या निष्कर्षांचा उल्लेख करण्यात आला असून त्यानंतर तत्कालीन कुलपती राजीव कुमार यांनी २७ जून २०२४ रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शुक्रवारी पुण्यातील जीआयपीई येथे झालेल्या बैठीकीत रानडे यांची बाजू देखील ऐकून घेण्यात आली, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील गोखले इंस्टिट्यूट ही भारतातील सर्वात जुनी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. कुलपती बिवेक देबरॉय यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीनुसार, रानडे हे प्राध्यापक म्हणून १० वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवाचा निकष पूर्ण करत नाहीत. रानडे यांना लिहिलेल्या पत्रात देबरॉय यांनी म्हटले आहे की, त्यामुळे तुम्हाला तातडीने पदावरून हटवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
या बाबत चौकशी समितीने अनेक बैठका घेतल्या. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर समितीने सांगितले की, कायदेशीररित्या रानडे त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. यूजीसीच्या नियमांनुसार, नियमांचे उल्लंघन किंवा अक्षमतेचे प्रकरण समोर आल्यास कुलगुरू कुलगुरूंना त्यांच्या पदावरून हटवू शकतात. जीआयपीईचे प्राध्यापक सदस्य मुरली कृष्णा यांनी रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या अध्यापनाच्या अपुऱ्या अनुभवाचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. यानंतर माजी कुलगुरू राजीव कुमार यांनी रानडे यांना २७ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
त्यांच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना रानडे म्हणाले की, गेली अडीच वर्षे मी पूर्ण निष्ठेने आणि माझ्या क्षमतेनुसार काम करत आहे. संस्थेच्या सकारात्मक विकासासाठी हातभार लावला आहे. माझ्या या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. हा निर्णय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी माझ्या कारकिर्दीत संस्थेतील सकारात्मक घडामोडींना हातभार लावत आहे. त्याकडे देखील डोळेझाक करण्यात आली आहे.
रानडे यांनी कुलगुरू पद सांभाळताच गोखले इंस्टिट्यूटमध्ये मोठे बदल केले. त्यांनी या ठिकाणी 'जिओस्क्वेअर' हे भू-राजकारण आणि भूअर्थशास्त्राचे केंद्र सुरू . या सोबतच दोन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील त्यांनी सुरू केले. त्यांच्या कार्यकाळात गोखले इंस्टिट्यूटमधील वर्गखोल्या देखील अद्ययावत करण्यात आल्या. तर वसतिगृहाची क्षमता २८० वरून ४०० खोल्यांपर्यंत नेण्यात आली. तर येथील हेरिटेज एसआयएस हॉलच्या जीर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये त्यांनी गुंतवले.
रानडे यांनी त्यांच्या कुलगुरू पदाचा अर्धा कार्यकाळ पूर्ण केला असून, या काळात त्यांनी विविध उपक्रम राबवले. मराठा आरक्षण आणि इतर काही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधीही त्यांच्या काळात संस्थेला मिळाली. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका नाही, पण तो ज्या नियमांमध्ये बसत नव्हते, असे 'जीआयपीई'चे प्राध्यापक नरेश बोडखे यांनी सांगितले.
रानडे हे जीआयपीईच्या व्यवस्थापन मंडळाचे माजी सदस्य होते. संस्थेत कुलगुरू म्हणून रुजू होण्यापूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांची ३२ वर्षांची कारकीर्द शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आहे. त्यांनी भारतात व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे.
रानडे यांच्या नियुक्तीला काही विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून विरोध करणारे वकील कौस्तुभ पाटील म्हणाले, 'रानडे हे यूजीसीच्या प्राध्यापक पदाच्या १० वर्षांच्या अनुभवाची अट पूर्ण करत नसल्याने अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी रानडे यांच्या नियुक्तीव आक्षेप घेतला होता. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, रानडे यांच्याकडे या कुलगुरू पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नाही. रानडे यांनी आपल्या कार्यकाळात चार नव्या सदस्यांच्या नियुक्तीसह अनधिकृत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून अनेक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क वाढवले आहे, असा आरोप पाटील यांनी केला. आम्ही या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती, पण त्याकडे बराच काळ दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे हा प्रश्न न सुटल्यास ५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संस्थेच्या भेटीदरम्यान काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशाराही पाटील व अन्य आंदोलकांनी दिला होता.
अजित रानडे हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट व आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. रानडे हे जीआयपीईच्या व्यवस्थापन मंडळाचे माजी सदस्य होते. संस्थेत कुलगुरू म्हणून रुजू होण्यापूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे समूह कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक समित्यांचे सदस्य म्हणून काम केले आहे. यासह भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) सारख्या राष्ट्रीय उद्योग संस्थांच्या शिखर समित्यांचे सदस्य देखील राहिले आहेत.