पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टीनंतर डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव, मिळाला तात्पुरता दिलासा-ajit ranade moves high court challenging termination as gokhale institute of politics and economics vice chancellor ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टीनंतर डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव, मिळाला तात्पुरता दिलासा

पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टीनंतर डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव, मिळाला तात्पुरता दिलासा

Sep 19, 2024 05:23 PM IST

Ajit Ranade termination Vice Chancellor : डॉ. अजित रानडे यांना कुलगुरूंच्या पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या याचिके सुनावणी झाली.

डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव

 Dr. Ajit Ranade Dismissal from Vice-Chancellor Post : पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे (Dr.Ajit Ranade)यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सोमवारी(२३सप्टेंबर) रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये,असे कोर्टाने म्हटले आहे. नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने सुनावणी चार दिवस लांबणीवर पडली आहे.

डॉ. अजित रानडे यांना कुलगुरूंच्या पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या याचिके सुनावणी झाली. आपल्या याचिकेवर तातडीने नियमित सुनावणी घ्यावी, अशी मागणी डॉ. रानडे यांच्यावतीने न्यायालयाला करण्यात आली. मात्र,नियमित खंडपीठ २२ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यास नकार दिला. कुलपतींनी रानडे यांच्या विनंतीवरून त्यांना पदमुक्त होण्यास शनिवार,२१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, डॉ. रानडे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी त्यांच्या याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत पदमुक्त करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ नये,असे न्यायालयाने आपल्या तीन पानी आदेशात स्पष्ट केले. डॉ. रानडे यांच्या याचिकेवरील सुनावणी २३सप्टेंबर रोजी होणार आहे.

डॉ. अजित रानडेकुलगुरू पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करीत नसल्याचं सांगत त्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना सलग १०वर्ष अध्यापन करण्याचा अनुभव नसल्याचं कारण पुढे करत त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. डॉ. अजित रानडे यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली नसल्याचे शोध समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले होते. त्यानंतर,समितीच्या शिफारशीच्या आधारे कुलपती बिबेक देबरॉय यांनी डॉ. रानडे यांची संस्थेच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द करून २१ सप्टेंबरपर्यंत पदमुक्त होण्याची मुदत दिली होती.

 

फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. यूजीसीच्या नियमांनुसार दहा वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव नसल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही माहिती दोन वर्षांपूर्वी नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना होती, असेही डॉ. रानडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. डॉ. अजित रानडे हे अर्थतज्ञ असून आयटी, आयआयएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्राउन विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या तज्ज्ञ समित्यांवरही रानडे यांनी काम केले आहे.

Whats_app_banner