Nawab Malik files nomination : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालेले व सध्या जामिनावर असलेले नवाब मलिक हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना मुंबईतून उमेदवारी दिली आहे. मलिक यांनी आज अर्ज दाखल केला. त्यामुळं आता भाजप मलिक यांचा प्रचार करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नवाब मलिक हे दिग्गज नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. तसंच अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यांनी एनसीबीच्या बेकायदेशीर कारवायांविरोधात जोरदार आवाज उठवला होता. तसंच, भारतीय जनता पक्षालाही घेरलं होतं. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले व त्यांना अटक करण्यात आली. नंतरच्या काळात राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट भाजपसोबत गेला. मलिक यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना संधी दिली. तर, मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्याचं निश्चित केलं होतं. मात्र, भारतीय जनता पक्षानं महायुतीकडून त्यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळं अखेरपर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता होती. त्यामुळं मलिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलही केला होता. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षानं त्यांना एबी फॉर्म दिल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या वतीनं अधिकृत अर्ज दाखल केला.
नवाब मलिक यांची लढत आता महाविकास आघाडीचे उमेदवार व समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याशी होणार आहे. आझमी हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची या भागात चांगली ताकद आहे.
नवाब मलिक यांना महायुतीमधील पक्षात घेऊ नये म्हणून याआधीही भाजपनं विरोध केला होता. मात्र तो विरोध नंतर मावळला. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यानंतर आता उमेदवारीची चर्चा होताच पुन्हा भाजपनं विरोध दर्शवला होता. दाऊदशी संबंध असलेल्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली होती. त्यामुळं आता भाजप मलिक यांचा प्रचार करणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.