Ajit Pawar: अजित पवार गटानं फडणवीसांचा शब्द डावलला; उद्या नवाब मलिक जन सन्मान यात्रेत उपस्थित राहणार!-ajit pawar vs devendra fadnavis nawab malik in ncp jan samman yatra ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: अजित पवार गटानं फडणवीसांचा शब्द डावलला; उद्या नवाब मलिक जन सन्मान यात्रेत उपस्थित राहणार!

Ajit Pawar: अजित पवार गटानं फडणवीसांचा शब्द डावलला; उद्या नवाब मलिक जन सन्मान यात्रेत उपस्थित राहणार!

Aug 18, 2024 10:16 PM IST

Ajit Pawar Jan Samman Yatra: अजित पवारांच्या मुंबई येथील जन सन्मान यात्रेत नवाब मलिक उपस्थित राहणार असल्याने महायुतीत बिनसण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत नवाब मलिक उपस्थित राहणार!
अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत नवाब मलिक उपस्थित राहणार!

NCP vs BJP: अणुशक्ती नगरचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भाजपने मलिक यांना सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्यास विरोध केला आहे. ७ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकारी अजित पवार यांना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीत मलिक यांच्या समावेशाला विरोध दर्शवला होता. असे असताना नवाब मलिक यांना अजित पवारांच्या गटामध्ये समावून घेण्यात आले. दरम्यान, उद्या अजित पवार यांची मुंबईतील अणुशक्तिनगर येथे जन सन्मान यात्रा होणार आहे. या यात्रेत मलिक उपस्थित राहणार आहेत. यावर भाजप काय भूमिका घेते? हे पाहावे लागेल.

नवाब मलिक यांनी आज दुपारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरून एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी असे म्हटले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांची महाराष्ट्रात चालू असलेली जन सन्मान यात्रा घेऊन आता आपल्या अणुशक्तिनगर तालुका येथे येत आहे. नागरिकांसोबत हितगुज करणे आणि 'माझी लाडकी बहीण योजने'बद्दल जनजागृती करणे, हे या कार्यक्रमाचे मूळ ध्येय आहे. रक्षाबंधनाच्या दिनी सोमवारी दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता चेंबूर येथील देवनार आगाराजवळ अजितदादा पवार यांच्या या जन सन्मान यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा पोस्टमध्ये नवाब मलिक यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह 'घड्याळ' वापरल्याने राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात सहभागी होणार? या चर्चेवर पूर्णविराम लागला.५४ आमदारांपैकी मलिक हे एकमेव आमदार आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अद्याप आपल्या बाजूने भूमिका स्पष्ट केली नव्हती. गुरुवारी त्यांनी आपल्या 'एक्स' हँडलवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार गटाला मिळालेले घड्याळ चिन्ह वापरले.

याबाबत विचारले असता नवाब मलिक म्हणाले की, मी कधीही पक्ष बदलला नाही, मी राष्ट्रवादीतच होतो. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही मलिक यांनी कधीही पक्ष सोडला नाही, असे स्पष्ट केले. त्यात नवीन असे काहीच नाही, कारण ते नेहमीच राष्ट्रवादीचा भाग राहिले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी विधान परिषद निवडणुकीसाठी अकरा जागांवर राष्ट्रवादीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ३ जुलै रोजी झालेल्या आमदार पक्षाच्या बैठकीत मलिक दिसले होते.

विभाग