पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भगदाड; शहराध्यक्ष, माजी महापौरांसह २४ नगरसेवक पुन्हा शरद पवारांकडे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भगदाड; शहराध्यक्ष, माजी महापौरांसह २४ नगरसेवक पुन्हा शरद पवारांकडे

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भगदाड; शहराध्यक्ष, माजी महापौरांसह २४ नगरसेवक पुन्हा शरद पवारांकडे

Jul 17, 2024 03:08 PM IST

Pimpri Chinchwad Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांनी पुन्हा मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षासह २४ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष, माजी महापौरांसह २४ नगरसेवक पुन्हा शरद पवारांकडे
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष, माजी महापौरांसह २४ नगरसेवक पुन्हा शरद पवारांकडे

Pimpri Chinchwad Politics : लोकसभा निवडणुकीत काकांच्या राजकारणासमोर निष्प्रभ ठरलेल्या अजित पवार यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. अजितदादांचं वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल २४ नेते व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यात अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह दोन माजी महापौर व इतर नगरसेवकांचा समावेश आहे.

खुद्द शरद पवार यांनी उपस्थित राहून पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवडमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अजित गव्हाणे यांच्यासह राहुल भोसले, यश साने आणि पंकज भालेकर यांनी मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजीनामे दिले. कोणत्या पक्षात जाणार हे यापैकी कोणीही कालपर्यंत स्पष्ट केलं नव्हतं. मात्र, आज अचानक शरद पवारांचे आशीर्वाद घेतले.

'भाजपकडून शहराच्या विकासात अडथळा'

पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित महाराष्ट्राला पुढं नेऊ शकणारा एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हा आहे. हा विश्वास असल्यानंच आम्ही या पक्षात आलो आहोत. औद्योगिक नगरीच्या विकासात भारतीय जनता पक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये चांगलं काम केलं आहे. मात्र आता ते भाजपसोबत गेले आहेत, असं गव्हाणे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड अजित पवारांसाठी महत्त्वाचे का?

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांचं मोठं राजकीय वजन आहे. त्यातही पिंपरी-चिंचवड हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका त्यांच्या (तत्कालीन अखंड राष्ट्रवादी) पक्षाच्या ताब्यात होती. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर व लोकसभेत पराभव झाल्यानंतर एकेक माणूस सांभाळणं अजित पवारांसाठी गरजेचं आहे. अशातच इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी पक्ष सोडल्यामुळं त्यांची चिंता वाढली आहे. कोणत्याही नेत्यानं पक्ष सोडला तर तो निश्चित धक्का असतो, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मान्य केलं.

अजित गव्हाणे विधानसभेसाठी इच्छुक

अजित गव्हाणे हे भोसरी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, सध्या तिथं भारतीय जनता पक्षाचे महेश लांडगे हे आमदार आहेत. ते पुन्हा इथून निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत आपल्याला संधी मिळणार नाही हे माहीत असल्यानं गव्हाणे यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर