Ajit Pawar In Pune : विनाकारण ट्रोल केलं जातंय, आमच्या नावाने पावत्या फाडू नका; अजित पवार विरोधकांवर संतापले
ajit pawar statement : शिक्षकांच्या पगारावरील वक्तव्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चौफेर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर अजित पवारांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ajit pawar statement on teachers salary : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील जीआर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु आता सरकारच्या याच निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिक्षकांच्या वेतनावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. आमच्या नावाने पावत्या फाडू नका, आम्हाला कारण नसताना ट्रोल केलं जात असल्याचं सांगत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. नवे शिक्षक येईपर्यंत मुलांना शिकवायला शिक्षकच नाही, असं सांगता येत नाही. त्यामुळं आम्ही राज्यातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात भरती करत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पुण्यात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला नाही. हा निर्णय पूर्वीच्या सरकारनेच घेतलेला आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये या निर्णयावर कुणी-कुणी सह्या केल्या, हे मी दाखवू शकतो. सध्या ते सरकार राज्यात नसल्याने आमच्यावर पावत्या फाडण्याचं काम सुरू आहे. आम्हाला बदनाम केलं जात आहे. परंतु राज्यातील शिक्षक आणि बेरोजगारांचे प्रश्न आम्हालाही कळतात. त्यामुळं आम्ही तात्पुरत्या स्वरुपात पदभरती करत आहोत, कायमस्वरूपी नाही, असं म्हणत अजित पवारांनी भरती प्रक्रियेवरील वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
काल मी दिवसभर मंत्रालयात होतो. दीड लाख जागांसाठी विविध विभागांमध्ये पदभरती करण्यात येत आहे. परंतु तरीदेखील आमच्या नावाने पावत्या फाडत ट्रोल करण्याचं काम सुरू आहे. आमच्याबाबत वेगळ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय अजित पवारांनी कंत्राटी पदभरती आणि अपुऱ्या शिक्षकसंख्येवरही भाष्य केलं आहे. काही विभागांमध्ये आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टाटा कंपनीसह अन्य तीन कंपन्यांकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.