मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं, 'वेदांता'वरून अजित पवारांचे सत्ताधाऱ्यांना खडेबोल

Ajit Pawar : खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं, 'वेदांता'वरून अजित पवारांचे सत्ताधाऱ्यांना खडेबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 17, 2022 09:31 PM IST

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर सरकारकडून याला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरण्यात आले. यावर अजित पवारांनी हल्ला चढवला.

'वेदांता'वरून अजित पवारांचे सत्ताधाऱ्यांना खडेबोल
'वेदांता'वरून अजित पवारांचे सत्ताधाऱ्यांना खडेबोल

बीड - कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं पाहिजे. पण तसं होत नाही.  गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता?” असा परखड सवाल अजित पवारांनी(Ajit Pawar) करत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती.त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त केले होते. त्याबरोबरच सत्ताधारी आमदारांकडून  विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधाने केली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंआहे. यावर आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांन, विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर सरकारकडून याला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरण्यात आले. यावर अजित पवार म्हणाले की, १५ जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली होती.आता म्हणतात मागच्या सरकारनं केलं. अरे मागच्या सरकारनं केलं हे काय सांगताय तोंड वर करून? १५ जुलैची मीटिंग झाल्याचं समोर आहे. काहीही बोलता काय? खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या शेतकऱ्याला पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचं उत्तर देत नाहीत. त्याचं उत्तर द्या ना. सत्तेची मस्ती,नशा आणि धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे, हे या सरकारनं लक्षात घ्यावं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या