मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  घराणेशाहीवर मोदींनी केलेल्या कडवट टीकेला अजित पवार यांचं ताबडतोब उत्तर, म्हणाले...

घराणेशाहीवर मोदींनी केलेल्या कडवट टीकेला अजित पवार यांचं ताबडतोब उत्तर, म्हणाले...

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 15, 2022 10:46 AM IST

Ajit Pawar On Narendra Modi: भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशासमोरची दोन आव्हाने आहेत, यामुळे देश पोखरला जातोय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Ajit Pawar On Narendra Modi: घराणेशाहीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे नाव घेत उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना देशासमोर घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही दोन आव्हानं असल्याचं म्हटलं होतं. "घराणेशाही देशाला पोखरत आहे. मी फक्त राजकीय क्षेत्राबाबत बोलतोय असं लोकांना वाटतं, मात्र दुर्दैवाने राजकारणात घराणेशाहीमुळे देशाच्या प्रतिभेचं मोठं नुकसान होतंय. एक असे लोक आहेत ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आणि दुसरे असे लोक आहेत ज्यांच्याकडे चोरीचं ठेवण्यासाठी जागा नाही." अस म्हणत विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला होता.

मोदींच्या या विधानाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, "जनतेनं निवडून दिलं तर लोकशाहीत ते तिथं जाऊ शकतात. पंडित नेहरूंची कारकिर्द आपण पाहिली. इंदिरा गांधींची कारकिर्द पाहिली, पोलादी महिला म्हणून जगात त्या लोकप्रिय झाल्या. राजीव गांधींची कारकिर्द पाहिली. मिस्टर क्लीन आणि संगणकासंदर्भातलं जे ज्ञान, संगणकाचं युग आणायचं काम त्यांनी केलं."

‘कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही अशा व्यक्तीला बळजबरीने तुम्ही पदावर बसवलं तर घराणेशाही म्हणू शकता. पंरतू एखाद्याच्या घरात जन्मलेली पुढची पिढी कर्तृत्ववान असेल आणि लोकशाही पद्धतीने त्यांच्या भागातल्या लोकांनी आमदार, खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे,’ असंही अजित पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांच्या भाषणात भाष्य केलं. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, मी भाषण ऐकलं. भ्रष्टाचाराचं कुणीही समर्थन करणार नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत असायला हवा त्याबाबत दुमत असायचं कारणच नाही.

IPL_Entry_Point