मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर अजित पवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका, म्हणाले..

केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर अजित पवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 01, 2023 03:29 PM IST

Ajitpawar on onenationoneelection : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन,वन इलेक्शन’ ही भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

Ajit pawar on one nation one election
Ajit pawar on one nation one election

देशात एक देश एक निवडणुकीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं असून एक देश,एक निवडणूक यावर एक समिती गठित केली आहे. सरकारच्या या पावलामुळे आगामी काळात लोकसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही एकत्रच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होऊ लागला आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अजित पवार यांनी ट्वीट करून एक देश एक निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ मुळे एकाच वेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.

 

अजित पवार यांनी म्हटलं आहे की आपल्या पंतप्रधान महोदयांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पाहायला हवं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.

अजित पवार म्हणाले, काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधार करणे अपरिहार्य असतात. परंतु, त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

 

विकास कामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो.

WhatsApp channel