Ajit Pawar on Baba Siddique Death : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी काही हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना त्वरित लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, अजित पवार यांनी सिद्दीकी यांच्या हत्येवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बाबा सिद्दीकी हे त्यांचा यांचा मुलगा व वांदे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर शनिवारी गेले होते. यावेळी दसरा उत्सव साजरा केला जात होता. यावेळी फटाके फोडण्यात येत होते. हल्ले खोरांनी हीच संधी साधून त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवार यांनी दुख: व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी, निषेधार्ह व वेदनादायी असल्यांचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली असून यात त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या घटनेमुळे मला मोठ्या वेदना झाल्या आहेत. या घटनेत त्यांचं निधन झाल्याने मला धक्का बसला आहे. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला असून या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रावादी प्रवेश केला होता. जवळपास ४८ वर्ष काँग्रेसमध्ये काम करुन बाबा सिद्दीकी यांनी हाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमी देखील आली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा ही सुरक्षा भेदून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या