उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातजन सन्मान यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा मावळमध्ये आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी एका कार्यकर्त्यानेअजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच झळकवलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले गेले. "एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत" अशा आशयाचे बॅनर हात घेऊन हा कार्यकर्ता घोषणाबाजी करत होता.
यावेळी अजित पवार भाषण करताना मध्येच थांबले व तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणत पुन्हा भाषण पुन्हा सुरू केले. सभा स्थळी असलेल्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याकडील बॅनर काढून घेतले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मावळमध्ये आयोजित महिला मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणासाठी उठताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने बॅनर दाखवत अजितदादा आपल्या राष्ट्रवादीत परत या, असे साकडे घातले. या कार्यकर्त्यांच्या हातात असलेल्या बॅनरवर 'आवाज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दादा या ना.. आपल्या राष्ट्रवादीत'असे लिहिले होते. तसेच हा कार्यकर्ता हातात बॅनर घेऊन मोठ-मोठ्याने ओरडत होता. तो अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची विनंती करत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित पवारांना राष्ट्रवादीत परत येण्याचे बॅनर दाखवल्यानंतर त्या कार्यकर्त्यांने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, पवार कुटुंब एक राहिले पाहिजे आणि विकास देखील असाच सुरु राहिला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी एक होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, अजितदादांनी पुन्हा आपल्या मूळ राष्ट्रवादीत परत यावे.
ज्यावेळी मी अजितदादा यांना बॅनर दाखवला. त्यावेळी अजितदादा मला म्हणाले की, नंतर भेट मी तुझ्याशी बोलतो. मात्र,अजितदादा याचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते आता भेटले नाहीत. पण मी त्यांची पुन्हा भेट घेणार आहे. मी पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या फोनवर देखील शरद पवार साहेबांचा तसेच अजितदादांचा फोटो आहे.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले की,भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, विरोध म्हणत आहेत की, सरकार पैसे परत घेणार आहे. तर असं काहीही होणार नाही. दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल,आम्ही पैसे परत घेणार नाही. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधणाऱ्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतो का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.