राष्ट्रवादी कॉंग्रेस- अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ताराचंद म्हस्के-पाटील यांनी दिवाळी मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. पत्रकारितेतून निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षात झालेल्या फाटा-फुटीनंतर म्हस्के अजित पवार गटासोबत गेले होते. मात्र शरद पवार यांच्याशी दीर्घाकाळापासून घनिष्ठ संबंध राहिल्याने ताराचंद म्हस्के पाटील हे अजित पवार गटात फारसे रमले नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा नुकताच निर्णय घेतला.
दिवाळी निमित्त बारामतीत जाऊन म्हस्के-पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणावरही चर्चा झाली. त्यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बारामती येथील गोविंद बागेत म्हस्के-पाटील यांचा शरद पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन पक्षात प्रवेश करून घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, अहमदनगरचे खासदार निलेश लंके, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, आमदार रोहीत पवार, योगेंद्र पवार, श्रीनिवास पवार उपस्थित होते.
फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधी-नेहरू यांचे विचार मांडणारे आणि सातत्याने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता यांचे हित जोपसणारे नेते शरद पवार यांचा दीर्घकाळापासून माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच त्याच्या विचारापासून दुर जाऊ शकत नव्हतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चांगले संबंध असल्याने मध्यंतरी पक्षफुटीनंतर काही काळ अजित पवार गटासोबत काम केले. धडाडीचे नेतृत्व, प्रशासनावर पकड, विकास कामासाठी आग्रही असणारे अजित पवार यांना भाजपने सोबत घेऊन त्यांची व त्यांच्या पक्षाची मोठी कोंडी चालविली असल्याने मी अस्वस्थ होतो. त्यामुळेच मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया ताराचंद म्हस्के-पाटील यांनी दिली.
म्हस्के-पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ वर्तमानपत्र अनेक वर्ष अहमदनगर जिल्ह्याचे वार्तांकन केले. शेती, पाण्याचे प्रश्न, ग्रामीण भागातील प्रश्न, राजकारण यावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे. ३७ वर्ष पत्रकारिता केल्यानंतर निवृत्तीनंतर ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन सक्रिय राजकारणात उडी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ असतांना ताराचंद म्हस्के पाटील यांच्यावर शरद पवार यांनी प्रदेश प्रवक्ते पदाची जबादारी सोपावली होती.