Lok sabha election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बंडखोरी केल्यानंतर सत्तेत जाऊन बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून एक चूक झाल्याची कबूली दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते, असे अजित पवार यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
अजित पवार यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात शरद पवारांना आव्हान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळाला, यात बारामती मतदारसंघातून लढणाऱ्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्याविरोधात उभे राहिलेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचाही समावेश होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभे राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे होते. अखेर सुप्रिया सुळे याच निवडून आल्या. लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले. यानंतर अजित पवार यांनी लोकसभेत माझ्याकडून चूक झाल्याची कबूली देत सुप्रियाविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होते, असे म्हटले आहे.
नुकतीच अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचे नसते. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. पण त्यावेळेस केले गेले. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झाले ते एकदा बाण सुटल्यासारखे होते. आज मला माझे मन सांगत आहे की, तसे व्हायला नको होते.'
राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवांरांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. सर्व नेते अजित पवारांसोबत, पण जनता मात्र शरद पवारांसोबत असे चित्र लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.