Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, खरा राष्ट्रवादी कोण हे जनतेने ठरवले आहे. आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. माझ्या राजकीय प्रवासात पहिल्यांदाच युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. या निवडणुकीत विरोधीपक्ष अपयशी ठरले आहेत. आम्ही लोकसभा निवडणुकीतील चुका सुधारल्या आहेत. पण तरीही विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकाला स्वत:ला मागे दाखवण्यावरून अजित पवार म्हणाले की, सकाळी सकाळी मी पिछाडीवर असल्याच्या बातम्या पाहिल्या, पण मी १ लाखांहून अधिक मतांनी विजयी झालो. एवढेच नव्हेतर मी नाराज असल्याच्या बातम्याही सुरू होत्या. जेव्हा मी फोन केला तेव्हा मला कळले की, मी मतपत्रिकेत आघाडीवर असल्याचे समजले. प्रसारमाध्यमांनी अशा चुका टाळाव्यात, कारण लोकांचा प्रसारमाध्यमांवर विश्वास आहे', असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘संपूर्ण राज्याचा विकास करायचा आहे, राज्यातील सर्वांना फायदा होईल, हे आमचे उद्दिष्ट आहे. हा आमच्या योजनांचा विजय आहे. आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली आणि लाडका भाऊ योजनाही आणली. याशिवाय, इतरही अनेक योजना आमच्याकडून आणल्या गेल्या. शेतकऱ्यांची वीज माफ झाली आणि कर्जही माफ झाले. केंद्र सरकारकडून लाखो कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रात आणले. आमच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी १२४ सिंचन योजना सुरू करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत या लोकांनी खोटी कथा चालवल्या, तरीही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.’
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आम्ही तेव्हा म्हटले होते की, आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि आता जनतेने जनादेश दिला. आमचे सरकार आज पडणार की उद्या पडणार याबद्दल विरोधक बोलत होते. तरीही आम्ही काम करत राहिलो आणि आज याचे उत्तर सर्वांना मिळाले. आता घरी बसून किंवा फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवता येणार नाही, असे जनतेने सांगितले आहे. आम्ही म्हणत होतो की, कार्यकर्ता घरी नाही तर लोकांच्या दारात चांगला दिसतो. २०१९ मध्ये जे सरकार स्थापन व्हायला हवे होते, ते स्थापन झाले नाही आणि जनतेला ते आवडले नाही. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण हे जनतेने ठरवले.’ २०१९ मध्ये शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या आणि आताही तितक्याच जागा मिळाल्या होत्या.