उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत लाडक्या बहिणींना प्रेमळ सल्ला दिला आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाहीत तर नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, त्यामुळे दोनवरच थांबा.पुण्यातील मावळमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान यात्रेत महिला मेळावा पार पडला. यावेळी महिलांना संबोधित करताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले. अजित पवारांच्या वक्तव्याने सभास्थळी एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जन सन्मान यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा मावळमध्ये आहे. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवारांनी मुलांबाळांवर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
अजित पवार म्हणाले, माय- माऊलींनो वाईट वाटून घेऊ नका. मला सगळ्या जाती धर्माच्या महिलांना हात जोडून सांगायचे आहे. मुलं बाळ होतात त्याला देवाची कृपा अल्लाची कृपा म्हणतात. पण काही देवाची वगैरे कृपा नसते. ही नवऱ्याची कृपा असते. त्यामुळेच पोरं बाळं होतात. कृपा करुन दोन मुलांवरच थांबा. दोनच मुले असतील तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. मुलांचा चांगलं शिकवता येईल.
अजित पवार म्हणाले, आम्ही ८० कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या,मावळमध्ये मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा अधिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. दोन मुलांना चांगलं शिक्षण देता येतं. त्यांचे संगोपन, पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर तुम्हीदेखील चांगलं जीवन जगू शकता.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले की,भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, विरोध म्हणत आहेत की, सरकार पैसे परत घेणार आहे. तर असं काहीही होणार नाही. दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल,आम्ही पैसे परत घेणार नाही. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधणाऱ्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतो का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
पुणे जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. महायुती मधील जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना मतदान करा.. आम्हाला आशीर्वाद द्या, म्हणजे ही योजना कायम सुरु ठेवता येईल,असं अवाहनही अजित पवारांनी केलं आहे.