महाराष्ट्राच्या विधानसभेची येत्या काही तासांत निवडणूक जाहीर होऊ शकते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. शरद पवारांनी आज अजित पवार यांना पुन्हा एकदा एक मोठा धक्का दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. याबरोबर रामराजे यांचे समर्थक असलेले फलटणचे विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांच्यासह संपूर्ण रामराजे गट अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात सामील झाला आहे.
फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित आहेत.
अजित पवारांची साथ सोडल्यानंतर आमदार दिपक चव्हाण म्हणाले की, महायुतीतील घटक पक्षांनी नेहमीच आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली. केवळ आमदारांना नाही तर आमच्या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांनाही अपनामास्पद वागणूक देण्यात येत आहे. घटक पक्षाकडून आमची कामे अडवली जात आहेत. जर कामेच होत नसतील आणि सन्मान मिळत नसेल तर मग त्या सत्तेत राहून किंवा महायुतीत राहून फायदा काय? असा थेट सवाल दीपक चव्हाण यांनी अजित पवारांना केला आहे.
दीपक चव्हाण म्हणाले, खरं तर आम्हाला महायुतीत करमतच नव्हतं. पण आमच्या नेत्याने निर्णय घेतल्याने आम्हाला जावं लागले. मात्र आमची कोणतीही कामे महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांनी केली नाहीत. आम्हाला सन्मान मिळाला नाही. नाईलाजाने आम्ही महायुतीत राहिलो.आम्हाला करमत नव्हते. मात्र हे अजित पवारांच्या लक्षात येत नाही. झालं गेलं जाऊ द्या आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी तुतारी हाती घेतली आहे.
यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, तुम्ही स्वगृही येत आहात. मला माहिती होतं तुम्हाला तिकडे करमणार नाही. आता योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे. राम कधी दिसत नाही,तसा राम आज आपल्याला मंचावर दिसत नाही,पण तो आहे,असं नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शरद पवार गटासोबत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो.