Maharashtra Election Exit Polls Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणीत महायुतीचे सरकार असल्याचा दावा केला केला आहे. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत फारकत घेत महायुतीत प्रवेश करून निवडणूक लढवली. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीकरांना आर्त साद घातली. बारामतीत प्रचारात अडकून पडल्याने त्यांना इतर मतदारसंघात फिरण्यास फार वेळ मिळाला नाही. यामुळे त्यांची जादू फारशी चालली नाही. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांना कमी जागा मिळत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. वस्तुस्थिती ही २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात मतदान पार पडलं. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फुट पडून दोन गट वेगळे लढण्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना तर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या बंडखोरी केलेल्या आमदारांनी महायुतीत जात निवडणूक लढवली. अजित पवार यांनी काका विरुद्ध बंड करून राष्ट्रवादीवर दावा केला. मात्र, त्यांचा हा विचार बारामती करांना पटला नाही. याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले. आता विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात पाहिल्यांना निवडणूक लढवली. जागा वाटप करतांना महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ५४ जागा आल्या तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला ८५ जागा आल्या. तर भाजपने सर्वाधिक १४८ जागा लढवल्या. तर मित्रपक्षांना ४ देण्यात आल्या. दरम्यान, एक्झिट पोलचे अंदाज पुढे आले असून यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारसे यश मिळतांना दिसत नाही.
जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या आमदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या आकडेवारी नुसार अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक आमदारांचा पराभव होण्याची शक्यता असून त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे,
चाणक्य स्ट्रॅटेजीज अजित पवार यांना २२ पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पोल डायरी नुसार १८-२८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात अलायी आहे. इलेक्टोरल एजने १४, मॅट्रिझने १७-२६, दैनिक भास्करने १५-२० जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत निर्माण केली. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तसेच बारामतीकरांना नवे नेतृत्व दिल्याचं सांगत युगेंद्र यांना निवडणूक देण्याचे आवाहन केले. या साठी शरद पवार हे स्वत: प्रचारात उतरले. तसेच सुप्रिया सुळे या देखील प्रचारात उतरल्या होत्या. तर इतर नातेवाईक देखील शरद पवार यांच्या बाजूला उभे राहिले. त्यामुळे अजित पवार यांचा मोठा काळ हा बारामतीत गेला. त्यामुळे इतर मतदार संघाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना पराभव बघवा लागला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार पैकी १ जागेवरच विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार देखील अजित पवार यांना फटका बसला असल्याचं पुढं आलं आहे. अजित पवार यांचे उमेदवार हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना नाकारण्याची शक्यता अधिक आहे. खरं चित्र हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.