विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत चढत असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत.एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करताना दिसत आहेत. मात्र आज महायुतीच्या प्रचारसभेत रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. सदाभाऊंच्या शरद पवारांवरील टीकेने उपमुख्यमंत्री अजित पवार व्यतीत झाले असून त्यांनी सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार करत महायुतीला थेट इशारा दिला.
अजित पवार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी,असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच, शरद पवारांवर पातळी सोडून केलेली टीका आमचा पक्ष सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिलाय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार तोंडातून रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे.
त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का?तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, असे सडेतोड प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले आहे.