NCP : 'अजितदादांसोबत नाईलाजाने गेलो’, अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP : 'अजितदादांसोबत नाईलाजाने गेलो’, अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!

NCP : 'अजितदादांसोबत नाईलाजाने गेलो’, अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!

Aug 17, 2024 10:59 PM IST

NCP Crisis : राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जरी मी अजित पवारांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी शरद पवारांशी संबंध तोडले नाहीत. आजही मी त्यांना नेता मानतो.

अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!
अजित पवारांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला!

साधारण एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीत अभूतपूर्व फूट पडली. या फुटीनंतर पक्षात दोन गट पडून अनेक आमदार अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आता अनेक आमदार घरवापसी करताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला लागल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वर्ध्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण अजित पवार यांच्यासोबत नाईलाजामुळे गेल्याचे, मात्र शरद पवारांना नेते मानत आल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक करत आपण आयुष्यभर शरद पवार यांचे ऋणी राहणार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर अजित पवार गटासोबत जाण्याचे कारणही सांगितले.

राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जरी मी अजित पवारांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी शरद पवारांशी संबंध तोडले नाहीत. आजही मी त्यांना नेता मानतो. मागच्या २ वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून शरद पवारांचा आदर केला आहे.

जिल्हा बँकेला ३०० कोटींचा निधी दिला -

गेल्या ३० वर्षापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. मात्र मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो. आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले आहेत. परंतु निश्चितपणे शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील, असे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं.

राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांच्या गटात जाण्याच्या निर्णय घेतला होता.

 

कार्यक्रमानंतर राजेंद्र शिंगणे म्हणाले की, सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीमध्ये आपण होतो, त्यामुळे मी आलो. शरद पवार साहेब आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो, काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिंगणे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या