MLA Devendra Bhuyar : राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारदेवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जाहीर भाषणात त्यांनी मुलींच्या दिसण्यावरून कमेंट केली आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
अमरावती येथे जाहीर सभेत बोलताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, मुलगी जर दिसायला खुपच स्मार्ट असेल एक नंबरची देखणी मुलगी असेल तर ती नोकरीवाल्या मुलाला मिळते.ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही.त्यासाठीनोकरी लागते. दिसायला दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, तर ज्यांची पान टपरी आहे, धंदा किंवा किराणा दुकान आहे. दिसायला तीन नंबर असणारी व राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं नाही, असं विधान भुयार यांनी केले आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुन टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भुयार यांचे हे विधान शेतकरी मुलांची टिंगल टवाळी करणारा प्रकार आहे. सत्ताधाऱ्यांना खात्री आहे की, आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार नाही, या मस्तवालपणातून अशी वाक्ये येतात. शेतकरी आणि महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा सवालही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका करत महिला उपभोगाचं साधन आहे का? असा सवाल केला आहे. तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.