Vijay Wadettiwar Tweets: अजित पवार गटातील नेते नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर फाडल्याने मनसे पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओवरून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
विजय वडेट्टीवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चार जण एका व्यक्तीला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीत या संबंधित व्यक्तीचे कपडे फाटले आहेत. मारहाण करणाऱ्यांपैकी एक व्यक्ती त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघून माफी मागायला सांगत आहे.
विजय वडेट्टीवारांनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हीडिओ समोर आला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे दादागिरी करतात आणि कारवाई होत नाही. सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस मुंब्रा येथे साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रातील बाहुबली मैदान परिसरात शुभेच्छा देण्यासाठी फलक बसविण्यात आले. हे फलक अनधिकृत बसविण्यात आल्याचा आरोप करत मनसे पदाधिकारी इरफान सय्यद यांनी ते फाडले. याबाबत अजित पवारांच्या गटातील कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी इरफान सय्यदला मारहाण केली.