Ajit Pawar in Beed : उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. त्यांचे धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत भाषण करत कार्यकर्त्यांना सुनावले तसेच व्यथा देखील व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे मला येऊन भेटत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे लोक दुसऱ्या पक्षात होते. आता मात्र, मला येऊन म्हणतात की, दादा मी तुमच्यासोबत आहे. हे असं चालणार नाही. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं आणि एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हटलं तर चालणार नाही. तुमच्या चुका पोटात घेऊन माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही, असे देखील अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यावर आज गुरुवारी ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले आहेत. या बैठकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दमदार भाषण केलं. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यात तुम्ही जेवढी शिस्त लावाल तितका तुमचा फायदा होईल. तुम्ही चुकीच्या गोष्टी बंद करायला हव्या. आज या भागात काही पवनचक्की, सौरउर्जेचे प्रकल्प येत आहेत. मात्र, या उद्योगपतींना खंडणी मागीतल्या जात आहे. अशा खंडणीबहद्दरांना माफ केले जाणार नाही. जर तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आले तर त्यांच्यावर थेट मकोका लावेल.
अजित पवार म्हणाले, जनतेशी व समाजाशी संबंध असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. तुमच्या भागातील साहित्यिक, विचारवंत व पत्रकारांचे म्हणणे देखील तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मी काम करताना कोणताही भेदभाव करणार नाही. मात्र, इतरांनी तो केला तर मी खपवून घ्यायला साधूसंत नाही. तुम्ही दुटप्पी वागणार असाल तर मी काम करणार नाही. मी सरळमार्गी आहे, सगळ्यांना मदत करेन. आम्ही इकडे गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नसून काम करायला आलो आहोत असे देखील अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या