नाशिकमधील मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी करत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्ना पुरस्कार देण्याची विनंती केली.
मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्यातील भुयारी मेट्रोचं उदघाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला ऑनलाइन स्वरुपात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली.
अजित पवार म्हणाले की, मी एवढा मोठा अर्ध पुतळा महाराष्ट्रात दुसरा पाहिला नाही. या स्मारकामुळे नाशिकच्याही लौकिकात भर पडेल.महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा लढा देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. मुलींची देशातील पहिली शाळा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेथे मुलींची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येईल,असे सांगत त्यांनी नाशिकमध्ये उभारण्यात आलेले स्मारक उत्तम असून नाशिकच्या वैभवात भर घालणारे आहे, असे सांगितले. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडे जोतीबा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावं, यासाठी मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, संविधानाचा मार्ग दाखविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारणांसाठी लढा दिला. ते युगपुरुष होते. त्यांनी असामान्य कामगिरी बजावली. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळे परिवर्तन घडून आले. सामाजिक कार्यात त्यांचे नाव अग्रेसर राहील, असेही त्यांनी सांगितले.