राज्य सरकारने अर्थसंकल्पात घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या योजनेसाठी निधी कुठून आणणार असा सवाल विरोधकांनी करत सरकारला घेरले आहे. राज्यावर कर्जाचं ओझं असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. आता यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा खुलासा केला आहे.
अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच' मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. याआधी अर्थ व नियोजन तसेच सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे अजित पवार म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य असल्याचेही अजित पवार म्हणाले.
त्याचबरोबरराज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत असा आरोप अजित पवारांनी माध्यमांना सल्ला दिला. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे.
दरम्यान या योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असूनया महिन्याच्या अखेरीस अर्जांची संख्या एक कोटीवर जाण्याची सरकारची अपेक्षा आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टच्या सुमारास लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
उशिरा आलेले अर्ज जुलैमध्ये प्राप्त मानले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापर्यंत म्हणजेच १९ ऑगस्टला जमा करण्याचा आमचा विचार आहे.
संबंधित बातम्या