भाजपने आज महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवारांची घोषणा करत पाच विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही नेत्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मात्र अजित पवार गटाने जाहीर केलेली उमेदवार यादी लोकसभेसाठी नसून अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुणाचल विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उमेदवार यादीची घोषणा केली. अरुणाचल विधानसभेसाठी अन्य पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. यात राष्ट्रवादीने आठ जणांची उमेदवारी पक्की करत आघाडी घेतली आहे. पक्षाकडून दुसरी यादीही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे ६ आमदार निवडून आले होते.
राष्ट्रवादीकडून अरुणाचल प्रदेशातील याचुली, पंगिन, पक्के- केसांग, चांगलांग उत्तर, नामसांग, मेहचूका, मनियांग जेकु, चांगलांग दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात आले.
आज जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत याचुली विधानसभा मंतदारसंघातून लिखा साया, पंगिन विधानसभा मतदारसंघातून तपंग तलोह, पक्के केसांग विधानसभा मतदारसंघातून लोमा गोलो, चांगलांग उत्तर मतदारसंघातून न्यासन जोंगसम, नामसांग विधानसभा मतदारसंघातून नगोलिन बोई, मेहचुका विधानसभ क्षेत्रातून अजू चिजे, मनियांग जेकू विधानसभा मतदारसंघातून मोंगोल यामसो व चांगलांग दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वकील सलमान मोंगरे यांना संधी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या